नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात इंटरनेट, मोबाईल आणि कॉम्प्युटर हे विद्यार्थ्यांसाठी भलेही शिक्षणाचे माध्यम बनले आहेत. परंतु आता त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. ते म्हणजे लहान मुलांना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागत आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालय सतर्क झाले असून, मुलांना ऑनलाइन गेमिंगपासून रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये पालक, शिक्षकांना सतर्क करण्यात आले आहे. इंटरनेट, मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर काम करताना मुलांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऑनलाइन गेमिंगची अटच अशी असते, की ज्यामध्ये मुलांनी एकदा त्यामध्ये प्रवेश केला, तर बाहेर पडणे कठीण होऊन जाते. त्यामुळे आई-वडिलांना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
मुलांच्या ऑनलाइन गेमिंगच्या सवयीमुळे कुटुंबीयांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांनी साफ केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. चलाख गुन्हेगारांनी मुलांशी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून संपर्क करून गोपनीय माहिती मिळवून गुन्हा घडवून आणला आहे. एवढेच नव्हे तर, मुलांच्या आरोग्यावरही ऑनलाइन गेमचा दुष्परिणाम झाला आहे. मुलांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे त्यांना इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत असताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाशी संबंधित शिक्षण विभागाने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कुटुंबीय ज्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करतात, तेच लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मुलांना अभ्यासासाठी वापरू द्यावे. शिक्षकांनी इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगण्याच्या सूचना द्याव्यात तसेच ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थ्यांच्या वागणुकीकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काहीही संशयास्पद आढळल्यास त्वरित शाळा प्रशासनाला याची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा फसवणूक झाल्यास मदतीसाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी नॅशनल हेल्पलाइन आणि राज्यस्तरीय नोडल अधिकार्यांची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय करावे किंवा करू नये
१) आई-वडिलांच्या सहमतीशिवाय गेम खरेदी करण्याची परवानगी देऊ नये. अॅप खरेदी रोखण्यासाठी ओटीपी आधारित पेमेंटची प्रक्रिया स्वीकारावी.
२) सदस्यत्वासाठी अॅपवर क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे नोंदणी करू नये. प्रत्येक व्यवहारासाठी खर्चाची मर्यादा निर्धारित करावी.
३) मुलांना अज्ञात संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर आणि गेम डाउनलोड न करण्याचा सल्ला द्यावा.
४) त्यांना संकेतस्थळांवरील लिंक, फोटो आणि पॉप-अपवर क्लिक करण्यापासून सतर्क राहण्याच्या सूनचा कराव्या.
५) गेम डाउनलोड करताना इंटरनेटवर वैयक्तिक माहिती देऊ नये.
६) गेमिंग प्रोफाइलवर कधीही वैयक्तिक माहिती शेअर करू देऊ नये. त्यांना दीर्घकाळ खेळात सहभागी होण्याचा सल्ला द्यावा.
काही चुकीचे घडल्यास
१) ऑनलाइन गेम खेळताना जर काही चुकीचे झाले, तर त्वरित थांबावे आणि त्याचा एक स्क्रिनशॉट घ्यावा. त्यानंतर त्याची तक्रार करावी.
२) मुलांची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यास मदत करावी. त्यांना एक स्क्रिन नाव द्यावे (जसे अवतार इ.) चा वापर करण्याचा सल्ला द्यावा.
३) जर कोणी अनोळखी व्यक्ती अनुचित गोष्टीबद्दल चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट त्वरित आई-वडिलांना कळविण्याच्या सूचना द्याव्या.
४) फसवणुकीच्या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया न देण्यास प्रोत्साहन द्यावे. त्रास देणार्या संदेशांची नोंदणी करावी. गेम साइट व्यवस्थापकाला या गोष्टींची तक्रार करावी. किंवा ब्लॉक करावे.
५) आपल्या मुलांसोबत खेळावे आणि त्यांनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये याची काळजी घ्यावी.