इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनामुळे सध्या यात्रा-जत्रा बंद असल्या तरी यात्रेमध्ये मिळणारी गरमागरम जिलेबी बघून हमखास कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. जिलेबी हा अनेकांचा आवडता पदार्थ असून तो साखरेचा पाक, मैदा आणि चना डाळीचे पीठ यापासून तयार करतात, तसेच गुळापासून देखील जिलेबी तयार होते, परंतु ती एक दोन दिवस टिकू शकते, मात्र सुमारे आठ महिने जिलेबी टिकू शकते ! असे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु ते आता शक्य आहे, कसे काय?
शिमला येथील सेंट्रल बटाटा रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI), शास्त्रज्ञांनी बटाट्याची स्वादिष्ट आणि कुरकुरीत जिलेबी तयार केली आहे. विशेष म्हणजे ती लवकर खराब होणार नाही, आत्तापर्यंत फक्त बटाट्याच्या चिप्स, फ्रेंच फ्राय, कुकीज आणि लापशी तयार केली जात होती, मात्र आता बटाट्याची स्वादिष्ट आणि कुरकुरीत जिलेबीही ग्राहकांना खायला मिळणार आहे.
या बटाटा जिलेबीची चव आठ महिने खराब होणार नाही आणि साखरेच्या पाकात बुडवून त्याचा आस्वाद घेता येईल. सीपीआरआयच्या शास्त्रज्ञांनी देशातील कोणत्याही प्रकारच्या बटाट्याचा वापर करून जिलेबी बनवण्याचा मार्ग शोधला आहे. याबाबत संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.अरविंद जयस्वाल सांगतात की, बटाट्याची जिलेबी बनवताना साली सह बटाट्याचा वापर केला जातो. कारण सालीमध्ये भरपूर फायबर असते आणि बटाट्याचा स्टार्च जिलेबीमध्ये कुरकुरीतपणा आणतो. मात्र यासाठी ग्राहकांना बटाट्याची जिलेबी आणून साखरेचा पाक घरी तयार करून ती वापरावी लागणार असल्याचे देखील ते सांगतात. यासाठी मोठ्या नामांकित कंपन्यांशी बोलणी सुरू असून, ग्राहकांना डबाबंद बटाटा जिलेबी वापरण्यास किंवा खाण्यास लवकरच मिळणार असून ही जिलेबी आठ महिने खराब होणार नाही.
बाजारात मिळणारी मैद्याची जिलेबी जास्त काळ सुरक्षित ठेवता येत नाही. ती २४ तासांच्या आत वापरण्याची शिफारस केली जाते. अन्यथा मैदा जिलेबची चव खराब होऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बटाट्यापासून बनवलेल्या जिलेबीमध्ये ही समस्या येत नाही आणि ती काही महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येते. त्याच्या चव आणि कुरकुरीत फरक नाही.
विशेष म्हणजे सीपीआरआयच्या शास्त्रज्ञांनी बटाट्यापासून जिलेबी बनवण्याच्या सूत्राचे पेटंटही घेतले आहे. म्हणजेच बटाटा जिलेबीचा फॉर्म्युला विकून संस्थेला जादा कमाईही करता येणार आहे. जिलेबी विक्रीसाठी नामवंत कंपन्यांशी करार करण्यात येत आहे. बटाटा जिलेबीसाठी आयटीसीसारख्या नामांकित कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत, जेणेकरून डबाबंद जिलेबी देता येईल.