पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह गेल्याच्या संदर्भात राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र अखेर या प्रकरणावर पवार यांनी मौन सोडले आहे. या निर्णयावरच त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
शरद पवार यांची नेमकी प्रतिक्रिया कायमच राजकारणात चर्चेत असते. जेवढी त्यांचे व्यक्त होणे चर्चेत असते तेवढेच त्यांचे शांत राहणेही चर्चेत असते. किंवा उशिरा व्यक्त होणेही चर्चेचीच बाब असते. शिवसेना प्रकरणात त्यांची प्रतिक्रिया उशिरा आली असल्याचीही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह सोपविण्याचा निर्णय आयोगाने घेतला की आणखी कुणी घेतला, अशाप्रकारची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ‘राजकारणात मतभेद असतात. संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि पक्षचिन्ह हिसकून घेण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाचे निर्णय कोण घेतं, याची शंका निर्माण होते,’ असे शरद पवार म्हणाले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी असे काही केले नाही
मी काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो, पण तेव्हा असं काही केलं नाही. निवडणुक आयोगाने आम्हाला सूचवलं. मधला मार्ग काढला. शांततेत सारंकाही झालं. त्यांना हात दिला आणि आम्हाला घड्याळ दिले. पण आताच्या आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्हीही देऊन टाकलं. असं आजपर्यंत कधीच झालं नाही, असं शरद पवार म्हणाले.
जनता ठाकरेंच्या बाजूने
राज्यात जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण ज्या पक्षावर अन्याय होतो, जनता त्यांच्याच बाजूने असते. राज्यभरात दौरा करताना मला त्याचा अनुभव येत आहे. जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत बघायला मिळतील, असेही पवार म्हणाले.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1628365791312908289?s=20
NCP Chief Sharad Pawar on Shivsena Election Commission