शारदीय नवरात्र उत्सव
– पंडित दिनेश पंत
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरी केले जाते. यंदा २६ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव अर्थात घटस्थापना प्रारंभ होत आहे.
हिंदू धर्मातील सर्व सणवार हे कृषी क्षेत्राशी निगडित असून शारदीय नवरात्र उत्सव देखील एक कृषीविषयक लोकोत्सव मानला गेला आहे. म्हणूनच घटासमोर धान्य पेरून नवव्या दिवशी उगवलेले धान्य देवीला अर्पण करण्याचा प्रघात आहे.
पृथ्वीला त्रासदायक ठरलेल्या महिषासुर राक्षसाशी नऊ दिवस युद्ध करून देवी भगवती हिने त्याचा वध केला. त्या प्रित्यर्थ नवरात्र साजरे केले जाते, तर प्रभू श्रीराम यांनी दसऱ्याच्या दिवशी रावणावर विजय मिळवला म्हणून दसरा साजरा केला जातो अशी पौराणिक मान्यता आहे.
घटस्थापना शुभ मुहूर्त
सकाळी ६.२० मिनिटांपासून १०.१९ मिनिटापर्यंत आहे.
अभिजीत मुहूर्त ११:५४ पासून १२.४२ पर्यंत आहे.
आदिशक्ती देवीची साडेतीन शक्तीपीठे
शारदीय नवरात्र उत्सवात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनास विशेष महत्त्व असते. त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी, तर वणीची सप्तशृंगी देवी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत.
अनेक देवीभक्त नवरात्र उत्सवात नऊ दिवस उपवास करतात, तर काही अष्टमीचा उपवास करतात.
घटस्थापनावेळी सप्तशती पाठ करणे विशेष लाभदायी असते.
अष्टमीला होम हवन, चक्र पूजा, कुंकुमार्चन, फुलोऱ्याचा नैवेद्य करण्याचा प्रघात आहे.
अशी करा पूजा
देव्हाऱ्यातील कुलदेवतेचे टाक स्वच्छ धुऊन घटस्थापने वेळी मांडावे. त्यापुढे घट-कलश स्थापना करावी. झेंडूच्या फुलांची आरास करावी. नऊ दिवस सकाळ, सायंकाळ सप्तशती पाठ, देवीची आरती करावी. शक्य असल्यास उपवास करावा.
यंदाचे नऊ दिवसाचे देवी वस्त्राचे नऊ रंग पुढील प्रमाणे
26 सप्टेंबर – सोमवार – पांढरा
27 सप्टेंबर – मंगळवार – लाल
28 सप्टेंबर – बुधवार – निळा
29 सप्टेंबर – गुरुवार – पिवळा
30 सप्टेंबर – शुक्रवार – हिरवा
1 ऑक्टोबर – शनिवार करडा
2 ऑक्टोबर – रविवार – केशरी
3 ऑक्टोबर – सोमवार – गुलाबी
4 ऑक्टोबर – मंगळवार – जांभळा
सर्व वाचकांना नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Navaratri Festival Importance Muhurta and Details