मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकिंग क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, बँख कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. मे महिन्याच्या अखेरीस बँकेशी संबंधित तातडीची कामे असतील तर ते लगेचच पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मे महिन्याच्या शेवटी एक-दोन दिवसाच्या संपावर जाणार असल्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
विविध बँकांच्या अनेक बड्या बँक कर्मचारी संघटनांनी या संदर्भात संप पुकारला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी संघटनेने सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून असंतोष असून बँका आपल्या मागण्यांसाठी ३० आणि ३१ मे रोजी संपावर जाणार आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा आणि पंजाब अँड सिंध बँकेचे कर्मचारी ३० मे रोजी बंद राहणार आहेत, तर कॅथोलिक सीरियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, फेडरल बँक आणि युको बँकेचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी आधीच ठिकठिकाणी संपावर आहेत.
..म्हणून बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन (MSBEF) सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले की, संपूर्ण बँकिंग क्षेत्र सध्या गंभीर संकटात आहे आणि जवळपास प्रत्येक बँक कोणत्या ना कोणत्या आंदोलनाने त्रस्त आहे. गेल्या ५-६ वर्षांपासून बँकांकडून थर्ड पार्टीकडून अनेक कामे करुन घेतली जात आहेत. बँकांनी खाजगी माध्यमातून आउटसोर्सिंग सुरू केले आहे आणि त्यामुळे बँकांमधील नोकरभरती कमी किंवा थांबली आहे.
याशिवाय काही बँका शाखा बंद करणे, महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना बायपास करणे, मोठ्या प्रमाणात बदल्या करणे सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून त्याच्या निषेधार्थ कर्मचारी संपावर जात आहेत. पुढे ते म्हणाले, सध्या देशभरातील सर्व बँकांमध्ये सुमारे ९ लाख बँक कर्मचारी आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्व सामाजिक क्षेत्रातील योजना बँकांच्या माध्यमातून राबविल्या आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्ती झाल्या आहेत, परंतु नवीन भरती न झाल्याने आघाडीच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आणि ताण निर्माण झाला आहे.
आंदोलन करण्याचा निर्णय
एमएसबीईएफचे अध्यक्ष नंदकुमार चव्हाण म्हणाले की, फेडरल बँक सारख्या काही बँक व्यवस्थापन कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. युको बँकेशी संबंधित कर्मचारी संघटनांनी नागपुरात नुकत्याच झालेल्या बैठकीत बँकिंग उद्योगातील सर्वात गंभीर समस्या असलेल्या नोकरभरतीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर सलग ४ दिवस बंद
चौथा शनिवार (२८ मे) आणि रविवार (२९ मे) या दिवशी बँका बंद आहेत. जर संप पुकारण्यात आला तर तो ३० आणि ३१ मे असा राहणार आहे. म्हणजेच, शनिवार ते मंगळवार अशा सलग ४ दिवस बँका बंद राहणार आहेत.