मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कारण आता रिझर्व्ह बँक अॉफ इंडियानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचीही (एनएसई) अदानींवर करडी नजर आहे. गुंतवणुकदारांचे सर्व पैसे परत देणार असल्याचा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला असला तरीही आता एनएसईच्या भूमिकेमुळे गुंतवणुकदारांचे टेंशन जास्त वाढणार आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने अदानी उद्योग समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर मार्केटमधील अस्थिरता रोखण्यासाठी अदानी पोर्ट्स, अदानी इंटरप्रायझेस आणि अंबुजा सिमेंट्स या तीन कंपन्यांचे शेअर्स देखरेखीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समधील अस्थिरता कमी करण्याच्या प्रयत्नांमध्येच एनएसईने हे पाऊल उचललं आहे. आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी उद्योग समूहाचे मोठे नुकसान झाले. पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये फटका बसला आणि दोन दिवसांनी एफपीओ गुंडाळल्यामुळे मोठा फटका बसला. फक्त हिंडेनबर्गच्या अहवालामुळे ४२ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं. आता तर हे नुकसान १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजे ८.२३ लाख कोटी रुपयांचं हे नुकसान आहे.
अदानींवर अतिरिक्त पाळत
अदानी उद्योग समूहाचे तीन शेअर्स फ्रेमवर्कमध्ये ठेवण्याची घोषणा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने केली आहे. याला एएसएम असे म्हणतात. म्हणजेच अॅडिशनल सर्व्हिलन्स मेझर्स अर्थात अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपाययोजना. इंट्राडे ट्रेडिंगसाठी १०० टक्के अपफ्रंट मार्जिनदेखील आवश्यक असेल आणि यामुळे शॉर्ट सेलिंगला आळा बसेल, असे एनएसईचे म्हणणे आहे.
National Stock Exchange Big Decision Adani Group Stocks