पॅरिस – देशाचा राष्ट्रध्वज हा त्या देशाच्या त्याग, समर्पण, विकास आणि अस्मितेचे प्रतिक असतो. त्यामुळे त्यात सहजासहजी कुठलाही बदल केला जात नाही. मात्र, एखाद्या देशाच्या राष्ट्रध्वजात एकाच रात्रीतून अचानक बदल झाला तर. हो असे झाले आहे. त्यामुळेच फ्रान्समधील नागरिक तीव्र संतप्त झाले आहेत.
फ्रान्सने देशाच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये बदल केला आहे. आता झेंड्यातील निळ्या रंगाऐवजी गडद निळा (नेव्ही ब्लू) रंग दिसणार आहे. फ्रान्समध्ये झालेल्या राज्यक्रांतीचा हा रंग प्रतीक मानला जातो. फ्रान्सने आपल्या राष्ट्रीय ध्वजामध्ये एका वर्षापूर्वीच बदल केला होता. परंतु याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते.
राष्ट्रध्वजामध्ये झालेला अचानक बदल पाहून नागरिक हैराण झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. फ्रान्स गणराज्याचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी हा बदल केला आहे. १९१४ मध्ये झालेल्या द्वितीय महायुद्धादरम्यान फ्रान्समध्ये झालेल्या क्रांतीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या आठवणीसाठी हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सन १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वॅलेरी गिस्कार्ड डीस्टाइंग यांनी युरोपीय संघाच्या ध्वजाच्या रंगाशी साधर्म्य प्रस्थापित करण्यासाठी फ्रान्सच्या ध्वाजाचा रंग फिकट निळा केला होता. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष मॅक्रों यांनी तिरंगा ध्वजासाठी नेव्ही ब्लू रंग निवडला आहे. हा रंग फ्रान्सची राज्यक्रांती, पहिल्या आणि दुसर्या महायुद्धातील योद्ध्यांचे बलिदान दर्शवतो.