सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुट्टीवर आलेले सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान गणेश सुखदेव गीते गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोटरसायकवरुन शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन ते घरी परतत असतांना सिन्नर तालुक्यातील चोंडी येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गीते यांच्या सहा वर्षाच्या मुलीचा मोटरसायकलच्या हँडल मध्ये पाय अडकला. त्यामुळे गाडीचा तोल गेला. आणि मोटारसायकलवरील जवान गणेश गीते यांच्यासह त्यांची पत्नी रुपाली, सहा वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा हे सर्व जण गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. परिस्थिती लक्षात घेता जवान गीते यांनी पत्नी रूपाली सह सहा वर्षाची मुलगी व दीड वर्षाच्या मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. पण, ते स्वतः मात्र पाण्यात वाहून गेले. आपल्या कुटुंबादेखत जवान गीते हे कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने य़ेते शोधकार्य सुरू झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर आतापर्यंत शोध सुरु आहे. गोदावरीच्या उजव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त आहे. त्यामुळे ते या पाण्यात वाहून गेले. रात्रीपासून शोधकार्य सुरू असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेत सर्व कुटुंबच पाण्यात पडले. पण, गीते यांनी पत्नीसह मुलांना वाचवले. यात त्यांचा श्वास कोंडला त्यामुळे ते वाहून गेले. या घटनेची माहिती सिन्नरसह परिसरात सर्वत्र गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश सुखरूप असावा अशी प्रार्थना सुध्दा केली जात आहे.
Nashik Sinner Accident Jawan Washed Away Godavari Canal