सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळा रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रक व इर्टिगा कारमध्ये समोरासमोर धडक झाली. तुर्की हुडीजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता इर्टिगा कारचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.
आराई येथील प्रविण राजेंन्द्र गांगुर्डे यांची इर्टिगा कार (क्रमांक एम.एच.१८ बी.सी ५८९३) आहे. गांगुर्डे यांच्यासह सटाणा शहरातील पिंपळेश्वर भागात राहणारे योगेश केदा जाधव हे नातेवाईकांसह दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दर्शनाला गेले होते. सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते सटाणा शहराकडे परतत होते. त्याचवेळी सटाणा शहराकडून देवळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने वाळूने भरलेला ट्रक (क्रमांक एम एच १८ बी. एच. ५१३५ः जात होता. त्याचवेळी तुर्की हुडी जवळ ट्रकने कारला जब्बर धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. २ जण जागीच ठार झाले तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पोलिस या अपघाताची चौकशी करीत आहेत.
Nashik Satana Road Accident Truck Car