नाशिक – नाशिक पोलिसांच्या भोंगळ आणि एकतर्फी कारवाईचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सर्वसामान्यांवर कारवाईचा कठोर बडगा उगारणारे नाशिक पोलिस मात्र काही जणांच्या बाबतीत मूग गिळून गप्प असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. आताचे प्रकरण हे खुद्द विशेष पोलिस उपमहानिरीक्षकांच्या घरचेच आहे.
विभागाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गोदावरी या शासकीय निवासस्थानावर रविवारी रात्री उशीरापर्यंत कौटुंबिक सोहळा सुरू होता. सोहळ्यात नाच गाणे सुरू असतांना त्यांच्यासाठी वेळेची बंधने शिथील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रकरणी पोलीसांनी मौन बाळगल्याने कायदा सर्वसामान्यांसाठीच का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नाशिक विभाग विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शेखर यांच्या घरी रविवारी कौटुंबिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. करोनाचे सावट पाहता सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली असतांना हा कार्यक्रम नियमांना अपवाद ठरला. रात्री उशीरा पर्यंत संगीत कार्यक्रम सुरू होता. काही दिवसांपूर्वी मल्लाहार खान झोपडपट्टीत हळदीच्या कार्यक्रमात वाद्याला परवानगी घेतली नसल्याने नवरदेवासह वाद्य वाजविणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र रात्री उशीरा पर्यंत शेखर यांच्या शासकीय निवासस्थानावर कार्यक्रम सुरू असतांना त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध केला गेला नाही. उलट या कार्यक्रमात शहरातील पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी सहभागी झालेत. हा प्रकार पाहता संतप्त नागरिकांनी कायदा सामान्य माणसांसाठीच का असा प्रश्न उपस्थित केला आहे. याप्रकरणी पोलीसांना विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. मात्र हे निर्बंध केवळ शहरातील नागरिकांसाठी का असा प्रश्न उपस्थित होत आहे.