मुंबई – राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीच्यावतीने कुंटे यांची चौकशी होणार आहे. ईडीने यासंदर्भात त्यांना नोटिस बजावली होती. त्यानुसार ते चौकशीसाठी हजर झाले आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला. माजी पोलिस आयुक्त परमीबर सिंग यांच्या आरोपांमुळे ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. परमबीर आणि देशमुख यांची चौकशी झाली आहे. तसेच, देशमुख यांच्या स्वीय सचिवांचीही कसून चौकशी करण्यात आली. आता
कुंटे यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. कुंटे यांना या प्रकरणाची काय माहिती आहे, वसुलीच्या प्रकरणात त्यांच्याकडे काही पुरावे आहेत काय आदींची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. तसेच, ईडीला यापूर्वी चौकशीत जी काही माहिती मिळाली आहे त्यातील तथ्ये आणि खातरजमाही कुंटे यांच्या चौकशीत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.