विहीतगावला चौकात गप्पा मारणाऱ्यांवर लुटारुंचा हल्ला
नाशिक – गप्पा मारत उभ्या असलेल्या दोघा भावांना धमकावित त्रिकुटाने दोघांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना विहीतगाव रोड भागात घडली. या घटनेत लुटारूंनी एका भावाच्या डोक्यात कोयत्याने वार करून ही लुटमार केली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजीद मुस्तफा शेख (२७ रा.साई केटर्सच्या बाजूला विहीतगाव रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख व त्यांचा मामाचा मुलगा फारूख शेख हे दोघे भाऊ रविवारी (दि.५) रात्री विहीतगाव रोडवरील माऊली लॉन्स समोरील रोडवर गप्पा मारत उभे असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या त्रिकुटाने दोघांना धमकावित शेख यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून दोघांचे सुमारे २० हजार रूपये किमतीचे मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेत शेख जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चौधरी करीत आहेत.
नाशिकरोडला वेटरचा गल्ल्यावर डल्ला
नाशिक – हॉटेलच्या गल्यावर परप्रांतीय वेटरने डल्ला मारल्याची घटना नाशिकरोड भागात घडली. या घटनेत साडे सात हजाराची रोकड वेटरने पळविली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुमार निहाला यादव (२५ रा.उत्तरप्रदेश हल्ली हॉटेल नालंदा शेजारी,ना.रोड) असे संशयीताचे नाव आहे.
याप्रकरणी रमेश विष्णू सुर्यवंशी (रा.धोंगडेनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुर्यवंशी यांचे हॉटेल हिरा बार आणि रेस्टॉरंट आहे. रविवारी (दि.५) रात्री ही घटना घडली. सुर्यवंशी यांनी हॉटेलच्या कामासाठी लागणारी सात हजार २०० रूपयांची रक्कम गल्याशेजारील लॉकरमध्ये ठेवली असता ती संशयीताने आपल्या खिशात घातली. सीसीटिव्ही यंत्रणेत ही बाब कैद झाल्याने सुर्यवंशी यांनी तात्काळ संशयीताची अंगझडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुख्य दरवाजाची काच फोडून तसेच फर्निचरची मोडतोड करून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.