नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकालीतील वर्षभरापूर्वी सील करण्यात आलेली कुंटणखान्याची जागा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कायदेशीर वापरासाठी खुली केली आहे. मुदत संपल्याने यापूर्वीचा आदेश निष्प्रभावी करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
भद्रकाली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ची अंमलबजावणी करत पिंपळ चौकातील ठाकरे गल्लीत छापा टाकला होता. या कारवाईत ६४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती. पत्र्यांच्या खोल्यांमध्ये त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जात होता. तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेची दखल घेत सर्व्हे नं. २२४ मधील घर क्रमांक ११३ मध्ये चालणाऱ्या कुंटणखान्याच्या जागा मालकास कारणे दाखवा नोटीस बजावून ही जागा वर्षभरासाठी सील केली होती.
या ठिकाणी चालणाऱ्या व्यवसायाबाबत सन २०१६ ते २०१८ दरम्यान भद्रकाली पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये पाच गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. सीलबंद केलेली वरील जागा ही कायदेशीर वापराकरिता खुली करण्यात येत असल्याचा आदेश नाईकनवरे यांनी दिला आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय जागा मालकाला करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले असून, या जागेचा मालकी हक्काच्या संबंधाने कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Nashik Police Commissioner Order Bhadrakali Place