मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सन २०२१ साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
“नक्षलवाद्यांमधील १०० टक्के भरती ही आदिवासी बांधवांमधून होत होती, ती बंद झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरी नक्षलवाद जो केला जातो, आपण जसे काही जगावेगळे करत असल्याचे भासवून जे साहित्य लिहिले जाते आणि यात काही लोक सहभागी होतात अशांना समाज क्षमा करु शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत नक्षलवादाचे उदात्तीकरण हे राज्य शासनाकडून होऊ शकत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौकशीनंतर काय कारवाई करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल’’, असे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.
State Government Enquiry Book Award Declared
Fractured Freedom Turungatil Aathavani v Chintan