नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिस आयुक्तालयातील अधिका-यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहे. तीन सहाय्यक पोलिस आयुक्तांसह दोन निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह व एका शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांची सोमवारी बदली करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाने या संदर्भातले आदेश सायंकाळी उशिराने निर्गमित केले. या आदेशानुसार सरकार वाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांची विशेष शाखेत, नाशिक रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची सरकार वाडा विभागात, तर विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांची नाशिक रोड विभागात बदली करण्यात आली आहे.
अंबडचे पोलिस निरीक्षकही बदलले
पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांची अंबड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अंबडचे निरीक्षक नंदन बगाडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. यासह अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश शिरसाठ यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.