इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक –
पांजरपोळ – पर्यावरण की उद्योग?
मित्रांनो, नाशिक शहरातील काही उद्योजकांनी मागणी केली की, चुंचाळे शिवारातील पांजरपोळ ह्या संस्थेची जागा औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी घेण्यात यावी आणि पाठोपाठ मा. आमदारांनी विधानसभेत हा विषय उपस्थित करून जागा संपादित करण्याची मागणी केली. त्यानंतर नाशिककारांमध्ये एकच चर्चा सुरु झाली, वर्तमानपत्रे, टी.व्ही. आणि समाज माध्यमांमधून ह्या विषयी अनेक मत-मतांतरे येऊ लागलीत. आपणांस नक्कीच प्रश्न पडला असेल कि ‘हे काय चालले आहे?’ चला आपण जाणून घेऊया.
पांजरपोळचा विषय नाशिकसाठी महत्वाचा तर आहेच, शिवाय नाशिकच्या वातावरणासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. पांजरपोळच्या जागेमध्ये किती झाडे आहेत? आणि पांजरपोळच्या ह्या जंगलामध्ये किती जनावरे निवास करतात? ह्याचा हिशोब आहे का कुणाकडे? आणि त्याचा नाशिकच्या वातावरणावर काय परिणाम होतो? हे तरी आपल्याला माहिती आहे का? आपण कुठलाही शास्त्रीय अभ्यास न करता निर्णय घेतो की नवीन ‘इंडस्ट्रीज’ आल्या पाहिजे, समजा जर त्या जागेवर असलेले जंगल तोडून नवीन ‘इंडस्ट्रीज’ आल्यात आणि शहराचे वातावरण बिघडले, विदर्भा सारखे नाशिकचे वातावरण सुद्धा उष्ण व्हायला लागले तर तिथे तुमची सुद्धा राहण्याची इच्छा असेल का? लोकांना एक गोष्ट कळली पाहिजे की कुठलाही विषय हातात घेतांना त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे किती गरजेचे आहे.
पांजरपोळ विषयी तर मी हेच सांगणार की नाशिकच्या अवती-भोवती खूप जागा आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आधीच अकरा एमआयडीसी आहेत, अजून अकरा एमआयडीसी निर्माण होऊद्या की परंतु वेगवेगळ्या ठिकाणी, सर्व काही नाशिकच्या सेंटर मध्ये आणणे जरुरी नाही. सिन्नर – घोटी, इगतपुरी – घोटी परिसर दरम्यान सुद्धा एमआयडीसी येऊ शकते. त्या शिवाय सिन्नर – संगमनेर महामार्ग परिसरात सुद्धा उद्योग येऊ शकतात. सिन्नर आणि आक्राळे एमआयडीसी मध्ये सुद्धा अजून खूप जागा शिल्लक आहेत, त्या भागात शेती होत नाही. येवला भागातील काही क्षेत्रामध्ये शेती होत नाही अश्या भागात एमआयडीसी येऊ शकते, त्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल. परंतु ज्या भागात सुपीक जमिनी आहेत, एकरी दहा कोटी पर्यंत जागेचे भाव आहेत, अश्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री व्यवसाय आला तरी तग कसा धरेल?
नाशिक शहराला लागून असलेले जंगल जाऊन तिथे इंडस्ट्रीज आल्यात, त्यामुळे होणारी तापमान वाढ आणि पर्यायाने तिथे येणाऱ्या मोठमोठ्या ट्रक, ट्रेलर्स, टँकर्स मुळे होणारे प्रदूषणा मुळे किती त्रास होईल? ह्याचा विचार केला आहे का? शहर हे नेहमी राहण्यायोग्य असणे अत्यंत गरजेचे आहे आणि इंडस्ट्रीज साठी शहराच्या बाहेर शेती नसलेल्या किंवा पडीक जमिनींचा विकास केला पाहिजे. आम्ही आयटी उद्योगामध्ये आहोत आणि आयटी उद्योगामुळे कुठलेही प्रदूषण होत नाही तरीही असे सांगेन कि पुणे शहराप्रमाणे आयटी उद्योग सुद्धा शहराच्या बाहेर १०-१५ किमी अंतरावर असायला हवा आणि मोठ्या इंडस्ट्रीज शहराच्या केंद्रबिंदू पासून ३०-४० किमी अंतरावर असायला हव्यात. ह्यामुळे शहरातील वातावरण चांगले व प्रदूषण विरहित राहील, शहरे राहण्यायोग्य असतील. सर्व संबंधितांनी ह्या बाबींचा देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून सारासार विचार करणे अत्यंत आवश्यक आहे, ह्यामुळे शहराचे भलं होईल.
नाशिक मध्ये इ.स. १८७८ साली स्थापन झालेली “श्री नाशिक पंचवटी पांझरपोळ” विश्वस्त संस्था १४४ वर्षांची असून ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ कडे नोंदणीकृत आहे. संस्थेच्या नाशिकमध्ये तीन गोशाळा असून, चौदाशे गायी आहेत. त्यातील २५० गायी दूध देतात. सर्व गायी संस्था स्वखर्चाने आजीवन सांभाळते. संस्थेचे चुंचाळे, सारूळ, बेळगाव ढगा हे क्षेत्र जैवविविधता म्हणून ओळखले जाते. उपरोक्त जैवविविधता झोनमध्ये पर्यावरण, जैवविविधता, सेंद्रिय शेती इत्यादींशी संबंधित प्रकल्प अहवाल, प्रबंध, संशोधन अहवाल, अभ्यास दौरा इत्यादीसाठी विशेष परवानगी देण्यात येते.
इथे प्रमाणित सेंद्रिय फार्म, सुमारे अडीच लाख झाडे, विविध फुले, फळे असलेली वृक्षराजी, ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ चे २६ शेततळे, जलचर, गांडूळखत प्रकल्प, मधमाशी पालन, गाईसाठी प्रमाणित सेंद्रिय पशुचारा उत्पादन, ४५० किलोवॉटचा सौर विद्युत निर्मिती प्रकल्प, पशू- पक्ष्याचा अधिवास, गोशाळा आहे. हे क्षेत्र पर्यटन संचलनालयाद्वारे ‘ॲग्रो टुरिझम’ मध्ये एक दिवसीय सहल केंद्र म्हणून नोंदणीकृत आहे. संस्थेने केलेल्या कार्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि विविध संस्थां कडून “गोपाळ रत्न पुरस्कार, कृषी भूषण पुरस्कार, वनश्री पुरस्कार, पर्यावरण मित्र पुरस्कार” इत्यादी अनेक मान-सन्मान मिळाले आहे. शहराजवळ एवढी प्रचंड बायोडायव्हर्सिटी व जंगल असलेले नासिक एक श्रीमंत शहर तर आहेच शिवाय पर्यावरणीय दृष्टिकोनातून ‘इको टुरिजम’ साठी हि उत्तम ठिकाण आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण आणि थंड हवेसाठी पांजरापोळचे जंगलही कारणीभूत आहे, आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही ते टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्याला औद्योगिक विकास हवाय परंतु शाश्वत विकास असला पाहिजे. आपण आपले निसर्ग, जंगल, सुपीक माती आणि नद्या यांचा बळी देऊन आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून कुठल्या प्रकारचा विकास करू पाहत आहोत? नाशिक शहराच्या मधून वाहणारी गोदावरी नदी सुद्धा आपण नीट स्वच्छ आणि निर्मळ ठेवू शकत नाही. अजूनही बऱ्याच गटार, नाले आणि सांड पाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदी पात्रा मध्ये सोडण्यात येत आहे. नदी काठी आणि नदी पत्रामध्ये देखील सिमेंटची अतिक्रमणे वाढत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. दिवसेंदिवस जमिनीची धूप होऊन सुपीक शेती योग्य जमिनी देखील आपण पडीक होतांना पाहत आहोत. आपल्या समोर माती वाचविणे हे देखील एक मोठे आव्हान आहे.
आपण सर्वांना लॉकडाऊन आणि कोरोनो काळात प्रदुषण विरहित नैसर्गिक जीवनशैली आणि ऑक्सिजनचे महत्व समजले आहे, ते विसरून चालणार नाही. कारण आजपासून दहा वर्षांनी जेव्हा लोकांना ऑक्सिजन मास्क घालण्याची वेळ येईल तेव्हा सर्वांना नाशिकच्या प्रदूषणविरहित, आल्हाददायक वातावरणाचे आणि नैसर्गिक थंड हवेचे महत्व निश्चित समजेल. नाशिक मधील सर्व एमआयडीसी मध्ये भरपूर रिकाम्या जागा उपलब्ध आहेत, बंद पडलेल्या उद्योगांचे मोकळे भूखंड, उद्योगांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या उद्योगांच्या जागा, स्थलांतरित उद्योगांचा जागा, अविकसित जागा इत्यादी भूखंडाचे सर्व्हेक्षण करून त्यातील वापरायोग्य जमिनी नवीन उद्योगांना देऊ शकतो.
येत्या दहा वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, आयओटी, ऑग्युमेंटेड रियॅलिटी, व्हर्चुअल रियॅलिटी, इत्यादी नवनवीन तंत्रज्ञानामुळे मॅनुफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज मध्ये हि खूप आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या शहराच्या औद्योगिक विकासाबरोबरच निसर्गाच्या समृद्धी साठीही पुढील २५ वर्षांसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जे काही नवीन उद्योग नाशिक मध्ये आणायचे असतील ते शहर पासून कमीतकमी ३०-४० किमी अंतरावर पडिक किंवा नापिक जमिनीवर असावेत ही अपेक्षा आहे.
नाशिककरांनो आपणास काय वाटते? नक्की कळवा.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी (सहलेखक – विशाल जोशी)
श्री पियूष सोमाणी
ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik Panjrapol Industrial Development by Piyush Somani