नाशिक – नाशिकरोडच्या वडनेरगाव, वडनेर गेट परिसरात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबासह सुमारे ५० झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी नगरसेवक केशव पोरजे, उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांच्यावर वृक्षतोड कायदा, वन्यजीव कायदा, लोकप्रतिनिधी कायदा तसेच फौजदारी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नाशिक कृती समितीच्या अश्विनी भट, कर्तव्यशील सामाजिक संस्थेचे वैभव देशमुख व अन्य वृक्षप्रेमींनी केली आहे. वृक्ष तोडणा-या ठेकेदारामुळे वडनेर परिसरातील वीज चार दिवस खंडीत होती.त्याची भरपाई नगरसेवकाकडून करून घ्यावी, नवीन कायद्यानुसार एक झाड तोडल्यास एक लाख दंड असा पन्नास वृक्ष तोडल्याप्रकरणी पन्नास लाखाचा दंड नगरसेवक, ठेकेदाराकडून वसूल करावा, उद्यान विभागांचे टेंडर वाटप व कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावणप्रेमींनी केली आहे.
वडनेरच्या वृक्षतोडीबाबत कारवाईसाठी विभागीय आयुक्त, महापालिका आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडे पाठपुरावा सुरु झाला आहे. आदित्य ठाकरेंकडे व्टिटरव्दारे तक्रार करण्यात आली आहे. लवकरच त्यांची भेट घेतली जाणार आहे. उद्यान निरीक्षक शेख यांनी सांगितले की, वडनेरची ३६ झाडे तोडल्याप्रकरणी एकूण २० लाख ३५ हजार दंड वसूलीची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु केली असून सात दिवसात उत्तर न दिल्यास सराईत ठेकेदार उत्तम सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक कृती समितीच्या सदस्यांनी दिली.
वडनेरगाव आणि हांडोरे लॉन्ससमोरील दोन अशी चार डेरेदार झाडे तसेच वडनेरगेट ते पाथर्डी रोडवरील चाळीवर झाडे ७ आणि ८ जानेवारीला बेकायदेशीरपणे तोडली. तीस मजूरांच्या मदतीने झाडे तोडणा-या या ठेकेदार व नगरसेवकाकडे महापालिका, वृक्षप्राधिकरणाची परवानगी नव्हती. हायकोर्टाचे सर्व निकष त्यांनी पायदळी तुडवले. पर्यावरणप्रेमींनी पोलिस व वनखात्याच्या मदतीने पुढील असंख्य झाडे वाचवली. इलेक्ट्रिक कटर व अन्य साहित्य उपनगर पोलिस ठाण्यात जमा केले. अत्यावश्यक सेवा, अमरधाम सेवार्थ असे लिहिलेल्या टाटा ट्रकसह (एमएच 04 सीपी 9196) ठेकेदार उत्तम तुकाराम सोनवणे फरार झाला. या ठेकेदाराने या आधीही नाशिकरोडच्या झुलेलाल पतसंस्थेशेजारी पिंपळ, औंदुंबरची झाडी तोडली होती. नाशिकरोड पोलिस ठाण्यात त्याची तक्रार दाखल आहे. त्याने नाशिकरोडला अनेक ठिकाणी बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे नागरिकांनी सांगितल्याची माहिती नाशिकच्या कृती समिती सदस्यांनी दिली आहे.
वृक्षतोडीत भ्रष्टाचार
वृक्षप्रेमींनी महापौर सतीश कुलकर्णी यांना तसेच मनपा आयुक्त, उदयान उपायुक्त, उद्यान निरीक्षक यांना सातत्याने फोन लावले मात्र, प्रतिसादच मिळाला नाही. नंतर महापौरांनी कारवाईचे केवळ आश्वासन दिले. काठे गल्लीतही नगरसेवकाच्या पतीने नुकतीच अवैध वृक्षतोड केली. पर्यावरणप्रेमींनी पकडल्यानंतर ही लाकडे महापालिकेकडे जमा करण्यात आली. पेठरोडवर नगरसेवक तसेच नगरसेविकाचा पती यांनी घरमालकाचा विरोध असतानाही मोठे झाड तोडले. गंगापूरोडवरही नगरसेवकांच्या दबावाने झाडे तोडण्यात आली. आता त्याजागी पार्किंग, अनाधिकृत फेरीवाले आले आहेत. जेलरोड-टाकळीरोडवर व्यावसायिकाने शेतातील १२० झाडे तोडली. पर्यावरणप्रेमींनी पोलिस व उद्यान निरीक्षकांना बोलावून पंचनामा केला. व्यावसायिकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, कारवाई झाली नाही. आता शेतातील राहिलेली झाडेही तोडली गेली आहेत. नाशिकरोडला महिलेने स्वतःच्या पेरूच्या झाडाच्या फांद्या तोडल्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र पिंपळ, औदुंबर तोडणा-या उत्तम सोनवणे या ठेकेदाराला नागरिकांनी रंगेहाथ पकडून देऊनही कारवाई झालेली नाही. नाशिकरोडच्या माजी नगरसेवकाचा भाऊच बेकायदेशीर वृक्षतोडीत सक्रीय आहे. अधिकारी, नेते व ठेकेदार हे सर्व मिळून काळ्या कमाईसाठी अवैध वृक्षतोड करतात. झाडे तोडणारे ठेकेदारच स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकूडफाटा पुरवणा-या ठेकेदाराशी संबंधित आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने ठेकेदार पैसे कमाविण्यासाठी सर्रास झाडे तोडत असल्याचेही नाशिक कृती समितीच्या सदस्यांनी दिले.
नवीन कायदा निष्प्रभ
बेकायदेशीर वृक्षतोड केल्यास एका झाडामागे एक लाख दंड तसेच तुरुंगावासाची शिक्षा असा नवा कायदा आहे. मात्र, कायदा कठोर करूनही कारवाई होत नाही. वृक्षप्राधिकरण, महापालिका, कोर्ट अशी कोणाचीच परवानगी घेतली जात नाही. झाडे तोडताना मनपा अधिकारी हजर न राहणे, तोडलेली लाकडे खासगी वखारींना विकणे, पैसे मनपाकडे न भरणे, परवानगीपेक्षा जास्त फांद्या व झाडे तोडणे, तोडलेल्या एका वृक्षाच्या बदल्यात पाच झाडे लावणे, जीओ टॅगिंग आदी नियमांची पायमल्ली केली जात आहे. ठेकेदारांकडून दंडाची लाखो रुपयांची वसूली केली जात नाही. तरी त्यांनाच फर्जी ठेके दिले जात आहेत. एका ठेकेदाराकडे साडेनऊ लाखाची थकबाकी आहे, ती अद्याप वसूल केकेली नाही. नियमभंग केलेल्या दोन ठेकेदारांवर पर्यावरणप्रेमींच्या जागरूकतेमुळे कारवाई झाली आहे.