नाशिक – पंचवटीतील माने नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी (दि.१६) घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने घरात कुणीही नव्हते. या घटनेत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून नजीकच्या एका घरालाही याची झळ पोहचली आहे. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठी हानी टळली. रासबिहारी लिंकरोडवरील माने नगर येथील श्रीकृष्ण सोसायटी भागात ही घटना घडली. रो हाऊसला लागून असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये विठ्ठल बोरकर वास्तव्यास आहेत. गुरूवारी बोरकर कुटूंबिय कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही घटना घडली. बंद घरात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, छप्परसह शेडचे आजू बाजूचे पत्रे दुरवर फेकले गेले. या घटनेत घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सदैवाने घरात कुणीही नसल्याने मोठी हाणी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेत तात्काळ आग आटोक्यात आणली. या घटनेत नजीकच्या घराचे नुकसान झाले असून दारे खिडक्या निखळून पडल्या आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.