नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक व कर्मचारी असे ११ जणांनी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी यांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.या पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शहर सुरेश खाडे यांना याबाबत निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी मनपा मुख्यालयाच्या इमारतीतील सर्व मजल्यांवरील विभागांमध्ये व परिसरात भेटी देऊन पाहणी केली असता शासन निर्देशानुसार विविध विभागातील तसेच मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक असे एकूण ११ जणांनी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आले.या सर्वांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली.
मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच मनपाच्या सर्व कार्यालयांमध्ये कामा निमित्त येणारे नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून कार्यालयात मास्क परिधान करावे या पार्श्वभूमीवर पाहणीच्या वेळी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आल्यास संबधीत अधिकारी कर्मचारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू राहणार आहे.तसेच मनपाची सर्व विभागीय कार्यालये उपकार्यालये याठिकाणी या अनुषंगाने अचानक भेटी दिल्या जाणार असल्याचे मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी सांगितले.