नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे त्यांचे डिपॉजिटही वाचणार नाही, असे आव्हान देणारे शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत यांना गोडसे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असे गोडसे यांनी म्हटले आहे.
राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटात सामील झालेल्या गोडसे यांचा समाचार घेतला. नाशिक लोकसभा मतदार संघातून चेहरा कोण असेल, असे विचारले असता राऊत यांनी गोडसे हे चेहरा होते का, असा प्रतिप्रश्न करीत शिवसेना हे चार अक्षरच चेहरा असल्याचे सांगितले. गोडसे यांचे डिपॉजिटही वाचणार नाही, त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हानच त्यांनी दिले होते. त्यावर गोडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. हिम्मत असेल तर राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन आपल्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असे, प्रतिआव्हान गोडसे यांनी दिले. चेहरा नाही तर काम महत्वाचे असते. राऊत यांनी कधी उद्योजक, शेतकऱ्यांची बैठक घेतली का, या एका माणसामुळे शिवसेनेची वाट लागली, त्यांच्या चेहऱ्यामुळे राजकारणाची प्रतिमा मालिन होत आहे, असा टोलाही गोडसे यांनी लगावला. दरम्यान ठाकरे आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत असून त्यातून दोन्ही बाजूने एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे
Nashik MP Hemant Godse Open Challenge to Sanjay Raut
Politics Shivsena