नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोंगा प्रकरणावरुन नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना अटक केली आहे. हे दोघेही गेल्या दोन दिवसांपासून फरार होते. आज सकाळी या दोघांनाही पाथर्डी परिसरातून सातपूर पोलिसांनी अटक केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलिसांनी दातीर आणि पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना नोटिस बजावली होती. तसेच, ४ मे रोजी नाशिक पोलिसांनी नाशिक मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना हद्दपारीच्या नोटिसा दिल्या आहेत. या सर्वांना १० दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. आता नाशिक पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना अटक केली आहे.