नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुसमाडी वनतळ्याची दुरूस्ती व गाळ काढण्याच्या कामाने मोती नदीच्या संवर्धनाचे काम खर्या अर्थाने सुरू झाले आहे. नदीच्या संपूर्ण पाणलोटात लोकसहभागातून नदी स्वच्छता व जलसंवर्धनाचे उद्दीष्ट असून त्याने संपुर्ण परिसरात आर्थिक व सामाजिक बदल घडण्याची ही नांदी ठरेल, असे मत राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंदरकुमार सिंगल यांनी व्यक्त केले.
मोती – गारदा नदी संवर्धन प्रकल्पाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमीत्ताने आज कुसमाडी येथे वनतळ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी सुळेश्वर परिसरातील लोकांची बर्याच दिवसांपासून मागणी असलेल्या शाश्वत पद्धतीच्या जलसंवर्धन कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. नासिक जिल्ह्यातला सर्वातकमी पावसाचे प्रमाण असलेला हा परिसरा गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करतोय. त्या पार्श्वभूमीवर गंगागिरी प्रकल्प, रेन्बो फाऊन्डेशन, मराठमोळं इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, सृष्टी सोल्यूशन्स अशा विविध संस्थांच्या प्रयत्नातून मोती – गारदा नदी संवर्धन प्रकल्प आकारास येत आहे.
या प्रकल्पाच्या निमीत्ताने शास्वत पद्धतीने पाण्याच्या संवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून सुमारे पंचेचाळीस हजार वर्गमिटर क्षेत्रफळ असलेल्या कुसमाडी वनतळ्याच्या गाळ काढण्याच्या तसेच गळती दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. कुसमाडीतल्या मारूती मंदिरात झालेल्या यासमारंभात अध्यक्षस्थानावरून श्री.सिंगल बोलत होते. या प्रसंगी नमामी गोदा फाऊन्डेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, मराठमोळं इनोव्हेशन्सचे उमश ससाणे, परमानंद स्पोट्र्स अॅकॅडमीच्या संचालक भक्ती
कोठावळे, क्रीडा संघटन नितीन हिंगमिरे, गंगागिरी प्रकल्पाचे संस्थापक मनोज साठे, येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
बीजेएसचे भरीव सहकार्य
या उन्हाळ्यात मोती गारदा संवर्धन प्रकल्पाच्या वतिने कुसमाडीसह नायगव्हाण, हडप सावरगाव, धामोडे, नांदूर या पाच गावात जलसंवर्धनाची व वृक्षारोपणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मोती नदीच्या पाणलोटातील सर्व गावात ही
कामे केली जाणार आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात हाता उपलब्ध असलेल्या दिड ते पावणे दोन महिन्यात जास्तीत जास्त कामे करण्याचे उद्दीष्ट आहे. कुसमाडी वनतळ्याच्या निमीत्ताने भारतीय जैन संघटनेने मोफत पोकलॅन यंत्र उपलब्ध करून दिले आहे. संपुर्ण नदीच्या
परिसरासाठी बीजेएसच्या वतिने यंत्र उपलब्ध करून देण्याची ग्वाही संस्थेचे येवला तालुका संघटक श्रीश्रीमाळ यांनी या प्रसंगी बोलताना दिली.
डॉ. रविंदरकुमार सिंगल सदिच्छादूत
सुरूवातीला नदी प्रहरी प्रशांत परदेशी यांनी मोती गारदा नदी संवर्धन प्रकल्प सुरू करण्यामागची भूमिका विशद करताना सांगितले की, आपल्याकडे भूपूष्ठाच्या तुलनेत भुगर्भातल्या पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याकरिता मोती – गारदा नदीच्या पाणलोटात हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन जलसंर्धणाचे काम प्रामुख्याने केले जाणार आहे. या शिवाय जन प्रबोधनातून झाडे, झुडपे, वृक्षप्रजातींचे रोपण व जतन करून नैसर्गिक पद्धतीने भुगर्भातली पाणी पातळी वाढविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. राजस्थानच्या तुलनेत आपल्या भागात पडणारा पाऊस जास्त आहे, परंतू त्या तुलनेत ते भूगर्भात जिरविण्याचे उपाय मोठ्या प्रमाणावर केले जात नाही ही तुट या प्रकल्पाच्या वतिने भरून काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी पंचक्रोशितील ग्रामस्थांच्या वतिने या प्रकल्पास भरिव सहकार्य करून प्रकल्पाचा एक चेहेरा म्हणून समोर आलेले डॉ. रविंदरकुमार सिंगल यांची मोती – गारदा नदीचे सदिच्छादूत (Brand Amabassidor) म्हणून घोषणा करण्यात आली.
मराठमोळंचे उमेश ससाणे यांनी मोती नदीच्या पाणलोटातील प्रत्येक नागरिकांस पाण्याच्या कामासाठी स्वेच्छेने पुढे येण्याचे आवाहन करताना मराठमोळंच्या वतिने पाण्या बरोबरच परिसरात विकेंद्रीत अर्थव्यवस्था राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले. कृषी पुरक
उदयोगांना चालना देताना महिलांसाठीच्या उद्योगांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पन्नास वर्षांपूर्वी हा बंधारा बांधला होता, परंतू नंतर त्याला गळती लागली. ही गळती दुरूस्त होत असताना नदीच्या पाणलोटात लहान झरे व ओहळींवर कामे करण्याची निकड राजेश पंडित यांनी बोलून दाखवली. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अनूभवातून जमिनीच्या उभ्या बंदिस्त साठ्यात पाणी मूरविण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. रविंदरकूमार सिंगल पुढे म्हणाले की, पाण्याच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक संस्था ही नदी पूनरूज्जीवित करण्यासाठी पुढे आल्याने जसजशी जलसंवर्धनाची कामे पूर्ण होतील तसतसे नदीच्या संपुर्ण ७१ किलो मिटर क्षेत्रात भूगर्भातील पाण्यात वाढ होईल, त्याने शेती उद्योगाला त्याचा मोठा लाभ होईल, इथल्या निसर्गाचे उत्तम संवर्धन होईल. इथल्या हरणांना, मोर आदी पक्षांना पण पाणी उपलब्ध होईल त्याने इथल्या पर्यावरणाची घडी बसण्यास झाडांची संख्या, गवतीमाळ वृद्धींगत होण्यास मदत होईल, या सगळ्या संवर्धन व पुनरूज्जीवन कार्यासाठी बाहेरून बरीच मंडळी हातभार लावत आहेत, तसाच हातभार स्थानिकांनी लावणे गरजेचे आहे तेव्हाच या परिसरात सुबत्ता येईल. भारतीय जैन संघटनेचे विशेष आभार मानताना त्यांनी मोती नदीच्या परिसरातील तरूणाईला स्वयंस्फुर्तीने पुढे
येण्याचे आवाहन केले.
मोती मॅरेथॉन
नदीसाठी असेल, झाडे लावण्यासाठी असेल की इथल्या पर्यावरणाचे संतुलन सुधारण्यासाठीचे प्रयत्न असतील, या परिसरातील प्रत्याकाने आपल्या वेळातला थोडा का होईना वेळ दिला तर त्याने या परिसराचा रूपडे पालटण्यास मदत होईल. लोकांचे शरिराबरोबरच मानसिक
आरोग्य सुधारण्यास याचा उपयोग होईल, असे सांगून डॉ. सिंगल यांनी नदीचे सदिच्छा दूत म्हणून मोती नदी स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा केली. आरोग्य, स्वच्छता व व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. नदी प्रहरी तथा या कार्यक्रमाचे आयोजक मनोज साठे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमानंतर कुसमाडी वनतळ्याच पुजन करून गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. याचे उद्घाटन डॉ. रविंदरकुमार सिंगल यांच्या हस्ते पूजन करून परमानंद स्पोर्टस् अॅकॅडमीच्या संचालक अपर्णा कोठावळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.
रणरणत्या उन्हात पोकलॅनच्या मदतीने बंधार्यातला गाळ काढण्यात आला तथा ते सहा ट्रॅक्टर्सच्या मदतीने बंधार्याच्या लगत वन हद्दीमध्ये टाकण्यात आला जेणे करून वनहद्दीतल्या वृक्ष संपदेला या सुपिक मातीचा लाभ होईल. या प्रसंगी पंचक्रोशितील ग्रामस्थांमध्ये भर उन्हाळ्यात हे काम सुरू झाल्याबद्दल उत्साह दिसून आला. काही ज्येष्ठ नागरिकांनी पन्नास वर्षांपूर्वी बांधलेला हा बंधारा गळतीचे ग्रहण लागल्याने लवकर आटत होता तो आता दीर्घकाळ पाणी धरून ठेविल असे मत व्यक्त केले.
Nashik Kusmadi Village Dr Ambedkar Jayanti Celebration