नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरी नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी व नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळा व महानगरपालिकेच्या शाळेत परिपाठ कालावधीत विद्यार्थ्यांना गोदावरी प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात यावा, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक तथा गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इगवे यांनी केले.
विभागीय माहिती कार्यालय, नाशिक येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, नाशिक आकाशवाणीचे प्रमुख शैलेश माळोदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी स.द.मोहरे, जिल्हा परिषदेचे स्वच्छता तज्ज्ञ संदीप जाधव, विस्तार अधिकारी ( शिक्षण) मनीषा पिंगळकर, शिक्षण विस्तार अधिकारी (प्राथमिक) एस.एन.झोले, महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गिरीष निकम अशासकीय सदस्य राजेश पंडित, निशिकांत पगारे उपस्थित होते.
श्री इगवे पुढे म्हणाले की, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यासाठी दर महिन्याला शाळांच्या प्रांगणात जलप्रदूषण रोखण्यासाठी पथनाट्य व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. परिवहन विभागाच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा करुन शहरातील रिक्षांवर गोदावरी प्रदूषण मुक्त संदर्भातील संदेशाचे प्रसारण करण्यात यावे. नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारीत होणाऱ्या ‘परिसर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला नद्या प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात यावे. साधू महंत, विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थाचा सहभाग घेवून जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात यावे, असेही श्री.इगवे यांनी सांगितले.
Nashik District School Paripath Change