नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील देवळाली भागात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काल रात्री तुफान राडा झाला. यावेळी हवेत गोळीबारही झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. आता याप्रकरणी नाशिक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गोळीबार प्रकरणी संशयित स्वप्नील लवटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील हा माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा आहे.
सूर्यकांत लवटे यांनी गेल्या महिन्यात शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. शिवजन्मोत्सवासंदर्भात देवळाली येथए काल बैठक होती. या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. अखेर याचे पर्यवसन तणावातही झाले. याचवेळी स्वप्निल लवटे याने हवेत गोळीबार केला. याची तत्काळ दखल घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दंगलविरोधी पथकही तेथे तौनात करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. याप्रकारामुळे नाशकात शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता हिंसक झाला आहे. हा वाद पुढे वाढू नये आणि शहराच्या अन्य भागात त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी आता कठोर कारवाई सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस कसून तपास करीत आहेत. स्वप्निल लवटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nashik Deolali Firing Case FIR Lodged Political
Swapnil Suryakant Lavate