शेजारणीने घेतला महिलेस चावा
नाशिक – मुलाच्या वादात समजून सांगत असतांना शेजारणीने एका महिलेच्या हाताच्या बोटांना कडकडून चावा घेतल्याची घटना जयभवानी रोड भागात घडली. या घटनेत महिलेच्या तीन बोटांना दुखापत झाली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुजा प्रणित साळवे (४० रा.जयभवानी रोड) असे चावा घेणाऱ्या संशयीत महिलेचे नाव आाहे. याप्रकरणी भारती विश्वनाथ साळवे (५४ रा.भालेराव मळा, माणिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित महिला आणि तक्रारदार या एकमेकांच्या शेजारणी असून मुलांच्या वादातून ही घटना घडली. दोघी महिलांच्या मुलांमध्ये मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी आपल्या घरासमोर किरकोळ कारणातून वाद झाला होता. यावेळी भारती साळवे या समजवून सांगत असतांना संतप्त पुजा साळवे यांनी दमदाटी करीत शिवीगाळ केली. याप्रसंगी झालेल्या झटापटीत पुजा यांनी भारती यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांना कडकडीत चावा घेत जखमी केले. या घटनेत भारती यांचे मंगळसूत्र तुटून आर्थिक नुकसान झाले असून अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.
नाशिकरोडला साडे सोळा लाखाची घरफोडी
नाशिक – नाशिकरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल साडे सोळा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पक संतोष धाडीवाल (रा.वर्धमान सोसा.जैन भवन शेजारी,आर्ट्रिलरी सेटर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धाडीवाल कुटूंबिय मंगळवारी (दि.३०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या किचनचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून तीन लाखाची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १६ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.