मुंबई – इंटरचेंज शुल्क आणि इतर खर्च वाढल्यामुळे बँकिंग सेवा तसेच उत्पादनखर्चात वाढ होत असल्यामुळे काही वाहनांच्या किमती जानेवारीपासून महाग होणार आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच परवानगी दिली होती. तसेच वाहननिर्माता कंपन्यांनीही दरवाढीचा निर्णय घेताल आहे.
नव्या वर्षात ग्राहकांसाठी बँकिंग सेवा महाग होणार आहे. एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिकचे शुल्क अदा करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने जूनमध्येच बँकांना शुल्कवाढीची परवानगी दिली होती. नव्या वर्षात ती लागू होणार आहे. प्रत्येक बँक ग्राहकांना रोख आणि इतर आर्थिक सेवांसाठी दर महिन्यात निशुल्क सेवा देतात. त्याहून अधिक सेवेचा लाभ घेतल्यानंतर बँकांकडून शुल्क वसूल केले जाते.
इंटरचेंज शुल्क आणि खर्च वाढल्यामुळे बँकांना एटीएममधून रक्कम काढण्यासाठीच्या शुल्कवाढीला परवानगी देण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. अॅक्सिस, एचडीएफसीसह इतर सरकारी व खासगी बँकांमधून रोख रक्कम काढण्यासाठी अधिकचे शुल्क अदा करावे लागणार आहे.
जानेवारीपासून इतके शुल्क
बँकांकडून दर महिन्यात एटीएममधून आठ वेळा पैसे काढण्याची सेवा मोफत देण्यात येते. यामध्ये आर्थिक आणि गैरआर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांचा समावेश आहे. ज्या बँकेत ग्राहकांचे खाते आहे, त्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्यात पाच वेळा मोफत व्यवहार करण्याची मुभा आहे. तसेच मेट्रो शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून तीन आणि उपनगरांमधील बँकांच्या एटीएममधून पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतात. आता एटीएममधून एका वेळी रोख रक्कम काढण्यासाठी २० रुपये लावले जातात. हेच शुल्क जानेवारीपासून २१ रुपये होणार आहे. यावर सेवा कराच्या रुपात जीएसटीही द्यावा लागणार आहे.
मारुतीची वाहने होणार महाग
उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता मारुती सुझुकी इंडियाने जानेवारीपासून पुन्हा वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षातच कंपनीकडून ही चौथी दरवाढ करण्यात आली आहे. मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, पोलाद, अॅल्युमिनिअम, तांबे, प्लास्टिकसह सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. वाहन निर्मितीसाठी या वस्तूंचा वापर ७५-८० टक्के केला जातो. एप्रिल-मे महिन्यादरम्यान पोलादचे भाव ३८ रुपये प्रति किलो झाले होते. आता ७७ रुपये मोजावे लागतात. अॅल्युमिनिअमचे दरही १७०० ते १८०० डॉलर प्रतिटनवरून वाढून २७०० ते २८०० डॉलर प्रतिटन झाले आहे. उत्पादनात वाढणारा खर्च पाहून पुन्हा वाहनांच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत.
ऑडीच्या किमतीत वाढ
जर्मनीमधील ऑडी या आलिशान कार निर्माता कंपनीने जानेवारीपासून वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लों जागतिक बाजारपेठेत उत्पादनातील वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही आम्हाला किमती वाढवाव्य लागणार आहेत.