मुंबई – आफ्रिकेतून भारतात शिरकाव झालेल्या ओमिक्रॉन विषाणूमुळे राज्यासह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आफ्रिकन देशातून प्रवास करुन आलेल्या दहा जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली येथील व्यक्तींचा समावेश होता. मात्र दोन दिवसांत आता ही संख्या २८वर पोहचली आहे.
एक- दोन दिवसापुर्वीच हाय रिस्क ( जोखीम ) यादीतील देशातून आलेले १० जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. मात्र आता ओमिक्रॉनचा फैलाव कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अधिक वेगाने होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रासाठी ही चिंतेची ठरणार बाब आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचा फैलाव जगातील २९ देशात झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली असून एकूण ३७३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
एका संशोधन – अभ्यासानुसार ओमिक्रॉन हा ५ पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे हा व्हायरस ओळखला जाऊ शकतो. दरम्यान भारतात कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन संशयीत सापडल्यानंतर महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यात आणखी आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे २८ संशयित असल्याची माहिती प्रशासनकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या आणि लगतच्या शहरांमध्ये आहेत. ही तिनही शहरे गर्दीची आणि मेट्रोपॉलीटन म्हणून ओळखली जातात.
या संशयितांपैकी मुंबईतील १० जण असून १८ जण हे लगतच्या विविध शहरातील आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यामधील २५ जण हे परदेशी प्रवास करुन आलेले असून ३ जण हे त्यांच्याच संपर्कातील आहेत. या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र ओमिक्रॉनची एस जिन चाचणीचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
दिवाळीपासून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात परदेशातून आतापर्यंत मुंबईत सुमारे २५०० पेक्षा जास्त प्रवासी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जण हाय रिस्क असलेल्या (जोखमीच्या ) ४० देशातून असून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे . तसेच प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरु आहे. त्यातील आतापर्यंत सुमारे ८६० जणांची आरटीपीसीआर टेस्टही करण्यात आली असून त्यांच्या पैकीच २५ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे संशयित रुग्ण मुंबई, पुणे ठाणे येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक जण हा लंडनहून आलेला आहे तर इतर चार जण हे दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल, मॉरीशस, जर्मनीहून आलेले आहेत. दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.