नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुंगीकारक औषध देवून कारचालकांना लुटणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पर्दाफास केला आहे. या टोळीतील महिलेसह चार साथीदारांना पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठत बेड्या ठोकल्या असून,या टोळीने चार गुह्यांची कबुली दिली आहे.संशयितांच्या ताब्यातून महागड्या तीन कारसह सुमारे १५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने अजून गुन्हे केल्याचा संशय पोलिस सुत्रांनी व्यक्त केला आहे.
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील बापू सूर्यवंशी (रा.सावतानगर) यांचा वाहन चालवण्याचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी यांच्याशी अनोळखी महिलेने दूरध्वनीवरून संपर्क साधत सूरत येथे जायचे असल्याचे सांगितले. १२ मे रोजी ठरल्या प्रमाणे संशयित काजल उगरेज (रा.रामवाडी, पंचवटी) या महिलेस दिंडोरीरोडवरील हॉटेल सायबा परिसरातून आपल्या कारमध्ये बसविले. प्रवासात वणी येथे महिलेचा एक अनोळखी मित्र भेटला. त्यास कारमध्ये बसवून प्रवासास लागलो असता संशयितांनी देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढा वाहनचालक सुर्यवंशी यांना खाण्यासाठी दिला.
पेढा खाल्यानंतर सूर्यवंशी यांची शुध्द हरपताच त्यांची स्विफ्ट कार, अंगावरील सोन्याचे दागिने, पाकिट असा एक लाख ९१ रुपये किंमतीचा माल या बंटी बबलीने लंपास केला. ज्यावेळी सुर्यवंशी यांना शुध्द आली त्यावेळी ते सुरतमधील एका दवाखान्यात उपचार घेत होते. त्यानंतर सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून लुटमारीची तक्रार दाखल केली. म्हसरूळ पोलीस व युनिट १चे पथक या घटनेचा तपास करीत असतांना तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हसरूळ परिसरातील गुन्हेगार निलेश राजगिरे याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ शोधकार्य हाती घेतले असता तो २२ मे रोजी पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने या गुन्हात सहभाग असणारी काजल व मुख्य आरोपी दिनेश कबाडे, किरण वाघचौरे व मनोज पाटील यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. विजय कबाडे याला नाशिकरोड परिसरातून वाहनासह ताब्यात घेतले. यानंतर संशयित महिला व तिच्या अन्य साथीदारांना पोलीसांनी शहरातील वेगवेगळ््या भागातून ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गुंगीकारक औषधे मिळाली.
पोलिस तपासात २१ मे रोजी त्यांनी अशाच पध्दतीने एक कार पळवल्याची कबुली दिली. संशयितांना न्यायालयाने शुक्रवार (दि. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीत टोळक्याची चौकशी केली असता म्हसरूळ हद्दीतील गुन्हात वापरलेली सियाज कार एमएच ०४ एचएफ ७३९१ व लुटलेले २९ ग्रॅम सोने असा १४ लाख ८६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील गुह्यातील १३ ग्रॅम सोने,घड्याळ मोबाईल असा ऐवज तसेच एमएच १९ बीयू ६५८५ स्विफ्ट कार,बनावट नंबर प्लेट असलेली एमएच १५ जीआर ५६३२ ब्रिझा कार हस्तगत करण्यात आल्या.
संशयितांच्या अटकेने म्हसरूळ,आडगाव, पालघर येथील कासा आणि औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीतील , मुख्य संशयित दिनेश कबाडे व किरण वाघचौरे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खूनासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहे.
Nashik Crime Police Burst Racket Car Theft