नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील बापलेकाच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव यांनी मुलगा प्रणव (१७ वर्षे) याचा खून करुन नंतर स्वतःला गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी जगदीश यांची पत्नी शोभा यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात या सर्व बाबी उघड झाल्या आहेत.
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतागुंफा जवळील रेवास्वामी सोसायटीत जाधव कुटुंबिय राहतात. जगदीश जाधव हे महापालिका कर्मचारी होते. तसेच ते गुरुदत्त सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक आहेत. प्रणवचा स्वभाव हट्टी होता तसेच तो वडिलांना उलटून बोलायचा, हात उगारायचा, घरात शिवीगाळ करायचा आणि याच सर्व प्रकारामुळे जगदीश हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. मंगळवारी (१७ मे) रात्री जेवण झाल्यानंतर आई-वडिल आणि प्रणव यांनी आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. त्यानंतर जगदीश आणि प्रणव हे बेडरुममध्ये गप्पा मारत बसले. तर आई शोभा ही दुसऱ्या रुममध्ये झोपी गेली. रात्री उशीरा जगदीश यांनी प्रणवचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
जगदीश आणि प्रणव यांच्या शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. शोभा यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.