नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वृध्दाश्रमाचे कार्यालय एकाने पेटवून दिल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत कार्यालयातील टेबल खुर्च्यांसह संगणक व महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद चव्हाण असे कार्यालय पेटविणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत डॉ. रमेश आनंदराव सोनवणे (रा.कोठारी शाळेजवळ जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. सोनवणे लक्ष्मीनगर येथील येस केअर सेंटर या वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक आहेत. गुरूवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. संशयिताने वृध्दाश्रमास लागून असलेल्या कार्यालयाच्या खिडकीची काच फोडून ही आग लावली.
कार्यालयात ज्वलनशिल पदार्थ टाकून संशयिताने पेटती काडी आतमध्ये टाकल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. अवघ्या काही वेळात कार्यालयातील साहित्य आगीत जळून खाक झाले. स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.