नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात घूसून हल्ला करीत जखमी महिलेचे दागिने बळजबरीने काढून घेत चोरटय़ांनी धूम ठोकल्याची घटना वर्दळीच्या पखालरोड भागात घडली.भरदिवसा घडलेल्या या घटनेप्रकरणी जखमीं महिलेच्या शिक्षक पुत्राने दिलेल्या तक्रारी वरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाद अनसारोउद्दीन काझी (55 रा.अनसार व्हिसा, पखालरोड) ही महिला या घटनेत जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी असद अनारोद्दीन काझी ( रा.हॅपीहोम कॉलनी पखालरोड) यानी तक्रार दाखल केली आहे. शमशाद काझी या सोमवारी (7 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करीत असताना ही घटना घडली. खोलीत एकट्या असल्याची संधी साधत घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्याच्या डोक्यात व कपाळावर वजनी वस्तू मारून जखमी केले व गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील बांगड्या असा सुमारे 90 हजार रूपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेत महिला जखमी झाल्या असून अधिक तपास निरीक्षक चंद्रकांत अहिरे करीत आहेत