नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित बाफणा हत्याकांडाबाबत नाशिक जिल्हा न्यायालयाने आज अंतिम निकाल दिला आहे. नऊ वर्षांपूर्वी हे हत्याकांड घडले होते. जेव्हा ते उजेडात आले तेव्हा राज्यभर ते गाजले होते. खंडणीसाठी विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती. या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने पाच पैकी दोघांना दोषी ठरविले आहे. तर, सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
असे घडले हत्याकांड
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबसिंग बाफणा यांचा मुलगा बिपीन याचा २०१३ मध्ये खून झाला होता. आडगाव ते विंचूरगवळी रस्त्यावरील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी संशयित चेतन यशवंतराव पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा. केवडीबन, पंचवटी), अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा.भारतनगर, वडाळारोड) आदींना अटक करण्यात आली होती.
पूर्ववैमनस्याची किनार, पोलिसांवर दबाव
खंडणी वसूल करण्याचा बनाव रचून संशयितांनी मुलाचे अपहरण करीत त्याची हत्या केल्याचे समोर आले होते. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेत पूर्ववैमनस्याचीही किनार होती. राजकीय वर्तुळातूनही पोलिसांवर दबाब वाढला होता. यामुळे या खून खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयात अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. संशयित २०१३ पासून मध्यवर्ती कारागृहात असून, खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे.
आजच्या सुनावणीत काय झाले
पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदविण्यात आल्याने त्याची खातरजमा न्यायालयाने केली. आजच्या सुनावणीत नाशिक न्यायालयाने निकाल दिला की, चेतन यशवंतराव पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा. केवडीबन, पंचवटी) हे दोघे या गुन्ह्यात दोषी आहेत. त्यामुळे या दोघांना येत्या गुरुवारी (१५ डिसेंबर) शिक्षा सुनावली जाणार आहे. तर, उर्वरीत संशयित आरोपी अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा.भारतनगर, वडाळारोड) या तिघांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
Nashik Crime Bafna Murder Case Court Verdict Today