नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी चोरट्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना गेल्या नऊ महिन्यापूर्वी कर्णनगर भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ८ च्या न्यायमूर्ती प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात चालला.
अफताफ अली अस्लम अली (१९ रा.साठ फुटीरोड मालेगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्णनगर भागात राहणारे सुनिल श्रावण डगळे (रा.बजरंग अपा.कर्णनगर) यांनी तक्रार दाखल केली होती. डगळे यांची यामाहा कंपनीची मोटारसायकल एमएच १५ एसएच ७९९१ गेल्या २० एप्रिल रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक जी.एस.माळवाळ यांनी करून आरोपीस अटक करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. सरकारतर्फे अॅड.जी.आर.बोरसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेल्या साक्ष आणि सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस चोरीच्या गुह्यात तीन महिने साधा कारावास आणि २०० रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
Nashik Court Crime Two Wheeler Theft Sentence
Punishment