नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरगाणा या आदिवासी विभागात कारवाई केली आहे. या कारवाईत हट्टी विभागाचा प्रभाग समन्वयक विलास मोतीराम खटके, तालुका अभियान व्यवस्थापक प्रमोद बाळासाहेब पाटोळे आणि खासगी एजंट यादव मोतीराम गांगुर्डे यांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, उमेद अभियानाअंतर्गत गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाचे मानधन देण्यासाठी खटके, पाटोळे आणि गांगुर्डे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला. सुरगाणा पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील पवार अमृततुल्य येथे या तिघांनी १० हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने या तिघांना रंगेहाथ पकडले. आता याप्रकरणी एसीबीच्यावतीने तिघांवर गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik Corruption Bribe ACB Raid Surgana
Trible Area