मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीच्या सरकारमध्ये असलेले व सध्या शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहेत. शिवसेनेत असल्याने भाजपाने सुडबुद्धीने ईडीची कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला होता. परंतु, शिंदे गटात जाऊनही सरनाईकांची संपत्ती ईडी जप्त करणार आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले होते. त्यात प्रताप सरनाईक हेदेखील होते. महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. यानंतर सरनाईक काहीसे बाजुला पडले होते. सुरुवातीला शिवसेनेचे नेते त्यांची बाजू मांडत होते, परंतू नंतर फारसे लक्ष दिले जात नसल्याने सरनाईक नाराज असल्याचेही समोर येत होते. यानंतर शिंदे गटासोबत गेल्याने ईडीची कारवाई थांबली की काय, असा प्रश्न शिवसेनेतून त्यांना विचारला जात होता. या प्रश्नाला उत्तर देणारी मोठी घडामोड आज घडली आहे.
प्रताप सरनाईकांची संपत्ती जप्त करण्यासाठी ईडीने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी ईडीने परवानगीदेखील मिळविली असून सरनाईकांची पहिल्या टप्प्यात ११ कोटींची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरारोडमधील कोट्यवधी किंमतीचा प्लॉट ईडी ताब्यात घेणार आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
Shinde Group MLA Pratap Sarnaik ED Property Seized