नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर व परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक व स्वच्छ ज्वलनशील अशा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) या स्वरूपात नैसर्गिक वायू मिळत असून लवकरच या वितरण व्यवस्थेचा जिल्ह्यात\अधिक विस्तार होत आहे. सद्यस्थितीत कंपनीच्या नाशिक परिसरात एकण २० सीएनजी पंप आहेत. पुढील सहा महिन्यात यात आणखी १५ पंपांची वाढ होणार आहे. तर, शहरातील एकूण १५०० घरांमध्ये पीएनजी गॅसची सेवा सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही संख्या थेट २५ हजारांवर जाणार आहे.
नाशिक आणि आसपासच्या भौगोलिक भागात सीएनजी ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी एमएनजीएल अधिकाधिक सीएनजी स्टेशन स्थापित करत आहे आणि सोबतच स्टील पाईपलाईनचा विस्तार करण्याचे काम सात्यत्याने चालू आहे. सीएनजी स्टेशनच्या विस्तारामुळे ही वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि नाशिकच्या भौगोलिक क्षेत्रामधील लोकांना हरित आणि स्वच्छ इंधनाकडे वळण्यास मदत होईल.
नाशिक व आजूबाजूच्या भौगोलिक परिसराला सीएनजी व पीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीने याबाबत योजना आखली आहे. आजमितीला, एमएनजीएल सुमारे 20 सीएनजी स्टेशन द्वारे नाशिक आणि आसपासच्या भागात सुमारे 7,000 वाहनांना सीएनजी पुरवठा करीत आहे. यामध्ये ऑनलाइन सीएनजी स्टेशन्सचा समावेश आहे ज्यातून नागरिकांना व सीएनजी वापरकर्त्यांना अखंडित सीएनजी पुरवठा केला जात आहे.
एमएनजीएलने नाशिक भौगोलिक क्षेत्रात पंधराहून अधिक उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांसह घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा सुरू केला आहे. नाशिक भौगोलिक क्षेत्रामध्ये कंपनीने सुमारे 300हून अधिक किलोमीटरचे स्टील आणि मध्यम दाबाचे पाइपलाइन नेटवर्क तयार केले आहे. एमएनजीएलने 2019 मध्ये नाशिक आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये शहरी गॅस वितरणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली.
नाशिकच्या जवळपास कोणतीही नैसर्गिक वायू पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे कंपनीने सीएनजी पुण्यातून कॅस्केडद्वारे गाड्यांमधून ट्रान्सपोर्ट करू नाशिकमध्ये वितरण करण्यास सुरु केली. सध्या गेल (इंडिया) लिमिटेड मुंबई-नागपूर-झारसुगुडा या मार्गावर नैसर्गिक वायू पाईपलाइन प्रकल्प विकसित करत आहे जो नाशिक जिल्ह्यातून जाणार असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर, नाशिक-धुळे भौगोलिक क्षेत्रामध्ये पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नसल्याने एमएनजीएलने’ एलएनजी’ स्टेशन उभारण्याच्या व्यवहार्यतेची तपासणी करून, एलएनजी स्टेशन एस्टॅब्लिश केले आहे.
कंपनी द्वारे गुजरातमधील’दहेज एलएनजी टर्मिनल’हून एलएनजी नाशिकला ट्रान्सपोर्ट करून त्याचे री-गॅसिफिकेशन करण्यात येते. त्यानंतर वाहनांसाठी सीएनजी तसेच नाशिक विभागातील औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती विभागांसाठी पीएनजी वितरित केला जातो. ही एलएनजी सुविधा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पाथर्डी, नाशिक येथे आहे. एमएनजीएलचे हे एलएनजी स्टेशन भारतातील प्रमुख अत्याधुनिक सुविधांपैकी एक आहे. आज, कंपनी प्रतिदिन सुमारे 1 लाख क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचे वितरण या एलएनजीसुविधेद्वारे करीत असून त्यातून नाशिक भागातील सीएनजी व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वापराकरिता असलेल्या मागणीचा पुरवठा केला जात आहे.
आज नाशिक महापालिका परिवहनच्या सुमारे 200 बसेस सीएनजीवर धावत आहेत. सध्या अंबड एमआयडीसी, पाथर्डी फाटा, सातपूर, इंदिरानगर, बिटकोरोड, नाशिकरोड, जेलरोड, सोमेश्वररोड, अंबड-सातपूररोड, सोमेश्वररोड, सिन्नर, इगतपुरी आदी भागात सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करत आहे. चांदवड परिसरातही पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. त्याचप्रमाणे, एमएनजीएल नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये नांदेड, बुलढाणा, परभणी इत्यादी जिल्हे तर तेलंगाणातील निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल, मांचेरिअल, कुमुरम – भीम – आसिफाबाद, कामारेड्डी इत्यादी जिल्ह्यांत प्रवेश करीत आहे.
Nashik CNG Pump Station and PNG Service