नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या कामामुळे प्रभाग २४ मध्ये निर्माण झालेल्या रस्ते, पाणी, खंडीत वीजपुरवठ्याच्या समस्या त्वरित सोडवा, अशा सूचना महापालिका शहर अभियंता नितीन वंजारी यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या. जेसीबी, रोलर, पाणी टँकर याद्वारे उपाययोजना केल्याशिवाय काम करू नये अशी तंबी दिली. दरम्यान, तिडकेनगरमधील रस्त्यावरील चिखलमाती हटवून हा रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे.
नाशिकच्या प्रभाग २४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस पाईपलाईनचे काम निष्काळजीपणे सुरू आहे. यामुळे तिडकेनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क आदी भागात पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे, पथदीपही बंद पडत आहेत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या समस्या त्वरित सोडविण्यासाठी उपाययोजना न केल्यास ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी दिला आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदार, महापालिका अधिकार्यांनी समस्यांची पाहणी केली. उपअभियंता हेमंत पठे यांनी बुधवारी, ८ मार्च रोजी सकाळी, तर शहर अभियंता नितीन वंजारी यांनी सायंकाळी यासंदर्भात बैठक घेतली. समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ठेकेदारांना दिल्या. पाणी मारून, रोलर फिरवून रस्त्यांचे सपाटीकरण करावे. रोलर, जेसीबी, कटर यासह विविध साधने असल्याशिवाय काम करू नये अशी तंबी दिली, अशी माहिती उपअभियंता हेमंत पठे यांनी दिली. तिडकेनगरमधील आकाश प्रेस्टिजजवळील रस्त्यावरील चिखलमाती बुधवारी आणि गुरुवारी हटविण्यात आली. येत्या काही दिवसात समस्या दूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यावर शिवसेना, सत्कार्य फाउंडेशन ठाम आहे, अशी माहिती सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख आदींनी दिली.