नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा न्यायालया समोर दुचाकी पार्क करून स्टॅम्प खरेदीसाठी जाणा-या व्यक्तीच्या हातातील बॅक दुचाकीस्वारांनी लंपास केली. या बॅगेत बँकेत तारण गहाण ठेवण्यासाठी आणलेले सुमारे चार लाख ८० हजार रूपये किमतीचे अलंकार आणि सदनिकेचे कागदपत्र होते. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज विठ्ठल महाजन (४१ रा.भाभानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. महाजन सोमवारी (दि.१५) दागिणे गहाण ठेवण्यासाठी एका नामांकित बॅकेत गेले होते. दागिण्यांचे मोजमाप करून त्यांना बॅकेतून स्टॅम्प खरेदीसाठी पाठविण्यात आल्याने ही घटना घडली. शिवीजा स्टेडिअम परिसरातील हुतात्मा स्मारक भागात ते दुचाकी पार्क करीत असतांना पल्सरवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकावून सीबीएसच्या दिशेने पोबारा केला.
बॅगेत सुमारे ४ लाख ८० हजार रूपये किमतीचे दागिणे आणि सदनिकेचे कागदपत्र होते. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट देवून परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून भामट्यांचा माग काढण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.