नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्या करणा-यांमध्ये एका पोलिस पतीचा समावेश आहे. पहिली घटना बळीमंदिर भागात घडली. केशवराव रामभाऊ मांजरे (६२ रा.पार्क साईड,बळीमंदिराजवळ) यांनी गेल्या २४ एप्रिल रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना नजीकच्या सह्याद्री हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून आडगाव मेडिक कॉलेज येथे दाखल केले होते. बुधवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ. महेश सोनवणे यांनी दिलेल्या खबरीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
दुस-या घटनेत सोमनाथ राजाराम महाले (३८ रा.सोमनाथ अपा.खंडोबा महाराज मंदिरासमोर कोणार्कनगर) यांनी बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी हुकाला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या दिक्षा महाले यांना आपल्या पतीशी संपर्क होवू न शकल्याने त्यांनी नातेवाईकास घरी पाठविले असता ही घटना उघडकीस आली. याबाबत रविंद्र वाघ यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
तिसरी घटना नाशिक पुणे मार्गावरील बंगाली बाबा भागात घडली. येथे राहणारे लहानू नामदेव काळे (६८ मुळ रा.पाथर्डी ता.सिन्नर हल्ली हॉटेल संगम जवळ,बंगाली बाबा) यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मद्याच्या नशेत त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत राहूल काळे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक ए.टी.पवार करीत आहेत.