नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा पाथर्डी रोडवरील नभांगन लॉन्स भागात धारदार कोयत्याच्या धाक दाखवित परिसरात दहशत निर्माण करणा-या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या संशयितांच्या ताब्यातून लोखंडे कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणय बाबुराव हिरे (१९ रा.कादंबरी सोसा.पेलीकन पार्क मागे,गणेश चौक सिडको) व अजय अरूण जाधव (१९ रा.कॉरेक्स रेमिडाईज कंपनीजवळ,अंबड) अशी पोलिसांनी कारवाई केलेल्या दोघा कोयताधारींची नावे आहेत. नभांगन लॉन्स भागात मंगळवारी (दि.९) रात्री धारदार कोयत्याचा धाक दाखवित परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत पोलिस नाईक सागर परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
तडिपार गजाआड
हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई जिल्हा रूग्णालय परिसरात करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन रामलाल पवार (२६ रा.राजदूत हॉटेल मागे,गोल्फ क्लब मैदान) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. पवार याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यास दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच बुधवारी (दि.१०) तो जिल्हा रूग्णालय परिसरात मिळून आला. पोलिस शिपाई निलेश वायकंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.