नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार विभागाच्या पथकांनी सिडकोतील कामटवाडा भागात दोघा सावकारांविरोधात सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सावकारांच्या घराची झडती घेतल्यानंतर आक्षेपार्ह कागदपत्र आढळून आल्याने उपनिबंधक प्रदीप महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात दोघा सावकारांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी प्रकाश पवार व राजू शंकर पवार (रा.अभियंतानगर,कामटवाडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सावकारांची नावे आहेत. सावकारांच्या जाचास कंटाळून शहरात आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्याने सहकार विभाग कामाला लागला आहे. बेकायदा सावकारीच्या तक्रारी प्राप्त होताच छापे टाकण्यात येत आहेत. अभियंता नगर येथील संशयितांच्या भक्तीसागर अपार्टमध्ये मंगळवारी (दि.३१) छापा टाकण्यात आला. पंचासमक्ष केलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती ३८ व्यक्तीचे धनादेश व विविध प्रकारचे आक्षपार्ह कागदपत्र तसेच २६ व्यक्तीच्या हात उसनवार पावत्या व कोरे चेक आढळून आले आहेत. संशयितांनी मोठ्या प्रमाणात जास्तीच्या व्याज दराने रकमा वितरीत केल्याचे पुढे आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.