नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरी आमिष दाखवून धुळे येथील चार जणांनी नाशिक येथील महिलेस तीन लाखाचा गंडा घातला आहे. समाज कल्याण विभागात अधिका-यांशी आपल्या ओळखी असल्याचे सांगत मुलाला नोकरी लावून देण्याची बतावणी करत या चौघांनी ही फसवणूक केली.
याप्रकरणी याप्रकरणी मीना सुरेश जगताप (रा.गंगासागरनगर, श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिने उलटूनही नोकरी न झाल्याने महिलेने पैश्यांसाठी तगादा लावला असता फसवणूकीचा प्रकार समोर आला. संशयितांनी पैसे देण्यास नकार देत तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी दिल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली. भूषण पाटील – देवरे (रा.नगावबारी रिक्षा स्टॅण्ड जवळ धुळे), किरण पवार,गणेश अरूण भावसार (रा.न्याहलाद धुळे ) व योगेश गायकवाड (रा.नगावबारी,धुळे) अशी महिलेस गंडविणा-या संशयितांची नावे आहेत.
या संशयितांनी महिलेस गाठून समाज कल्याण विभागात अधिका-यांशी आपल्या ओळखी असल्याचे भासविले होते. त्यामुळे महिलेने मुलास नोकरी लावून देण्याची विनंती केल्याने ही फसवणुक झाली. संशयितांनी महिलेच्या मुलास नोकरीस लावून देण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची मागणी केली होती. त्यानुसार महिलेने गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी रोकड जमवित संशयितांच्या ताब्यात तीन लाख रूपये दिले होते. या फसणूक प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.