नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादरोडवरील ओढा ते शिलापूर दरम्यान भरधाव कार दुभाजकावर धडकून पलटी झाल्याने विरूध्द दिशेने प्रवास करणारा दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. संदिप लुखाजी कहांडळ (रा.शिलापूर ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कहांडळ गेल्या सोमवारी सायंकाळच्या सुमारास ओढा गावाकडून शिलापूरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एफपी ४०९८ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. याच वेळी औरंगाबादरोडच्या विरूध्द दिशेने धावणारी भरधाव नेक्सॉन कारवरील चालकाचा आपला वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर धडकली. ही कार दुभाजक ओलांडून दुचाकीवर पलटी झाल्याने दुचाकीस्वार काहंडळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडिल लुखाजी कहांडळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक सागर नामदेव कुटे (रा.सायखेडा ता.निफाड) याच्याविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.