नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मद्याच्या नशेत कुलकर्णी गार्डन जवळ कोयत्याने वाहनांच्या काचा फोडणा-या संशयितास पोलिसांनी गजाआड केले आहे. अशोक बंडू पुंजारे (२२ रा.कामगारनगर,सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दहशत माजविण्यासाठी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेत दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पुंजारे याने रविवारी मद्याच्या नशेत धारदार कोयता घेवून फिरत होता. कोयत्याचा धाक दाखवित त्याने अनेकांना शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयिताने कुलकर्णी गार्डन भागात पार्क केलेली किया सेलटॉक्स एमएच १५ जेएक्स ३४५६ आणि मारूती एमएच १५ बीएक्स ५३३७ या कारच्या कोयता मारून काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत त्यास जेरबंद केले असून यात दोन्ही वाहनांचे सुमारे अकरा हजार रूपयांचे नुकसान करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भटू पाटील करीत आहेत.