आनंदवली भागातील २१ हजार रूपयाचा गुटखा जप्त, विक्रेत्यास अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आनंदवली भागातील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे २१ हजार रूपये किमतीचा गुटखा जप्त करुन विक्रेत्यास अटक केली. सुभाष लक्ष्मण गायकवाड (३८ रा.मारूती मंदिराजवळ,आनंदवली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची शहरात राजरोसपणे विक्री होत असल्याची सर्वत्र ओरड आहे. यापार्श्वभूमिवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी (दि.११) ही कारवाई करण्यात आली. आनंदवली गावातील गायकवाड चाळ भागातील बंगल्याच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट १ च्या पथकाने छापा टाकला असता शेडमध्ये विविध प्रकारचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा मिळून आला. या कारवाईत संशयितास अटक करीत पोलिसांनी २० हजार ८९४ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
दुचाकीस्वारांनी वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची बोरमाळ खेचून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील दत्तमंदिर रोड भागात भाजीपाला खरेदी करीत असतांना दुचाकीस्वार भामट्याने वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची बोरमाळ खेचून नेल्याची घटना घडली. भगवतीबेन पुरूषोत्तम ठक्कर (७६ रा.स्नेहबंध कॉलनी दत्तमंदिररोड धोंगडेमळा) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठक्कर या बुधवारी (दि.११) परिसरातील पदनाभ सोसायटी समोर भाजीपाला खरेदीसाठी गेल्या असता ही घटना घडली. रस्त्यावर भरणा-या भाजीबाजारात त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना अॅक्टीव्हावर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळय़ातील सुमारे ७२ हजार ५०० रूपये किमतीची सोन्याची बोरमाळ हिसकावून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.