नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड पोलिसांनी शहर व परिसरातून ४ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल जप्त केल्या. परिमंडळ दोन कार्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गाडी चोरणारा संशयित योगेश शिवाजी दाभाडे राहणार अशोकनगर सातपूर हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असतांना त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शहर व परिसरातून चार लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल जप्त केल्या.
शहर व नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी गाड्या चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गाड्या चोरणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करा असा आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई सुरू केली. गेल्या महिन्यात नाशिकरोड रेल्वे बस स्टॅन्ड परिसरातून सागर जाधव यांची दुचाकी गाडी चोरी गेली होती. त्यानंतर या संदर्भात त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता या मोटरसायकल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या. नाशिकरोड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, हवालदार अविनाश देवरे,यांच्यासह आदी पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले.