नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील बारदान फाटा जवळ भरधाव दुचाकीने पोलिस वाहनास धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील अर्जुन रामा कोरडे व नरहरी यादव पिंगळे (रा.देवरगाव ता.नाशिक) हे दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहे. त्यांच्याविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या निर्भया मोबाईल वरिल चालक सोनाली बागुल (रा.मखमलाबाद) यांनी तक्रार दाखल केली आहे. बागुल या आपल्या सहका-यांसमवेत गंगापूररोड भागात पेट्रोलींग करीत होत्या. निर्भया मोबाईल एमएच १५ एए ५२०७ घेवून त्या बारदान फाट्याकडून सोमेश्वर धबधब्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. गंगापूररोडवरून कवडे गार्डनच्या दिशेने त्या वळण घेत असतांना भरधाव बॉक्सर एमएच १५ बीसी ६१६३ ने पोलिस वाहनास धडक दिली. हा अपघात चालक अर्जुन कोरडे याचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने झाला. या अपघातात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले नसल्याने ते जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.