नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रोसेसींग फीसाठी एक अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून डॉक्टरच्या तीन बँक खात्यातून तब्बल पावणे तीन लाख रूपयांची रक्कम परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी ही रक्क्म परस्पर वर्ग केली. या फसवणूक प्रकरणी डॉ.सुदर्शन विजय पवार (रा.साधू वासवाणी रोड शरणपूर) यांनी तक्रार दाखल केली असून सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पवार यांच्याशी गेल्या ११ डिसेंबर रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता. ०६३६०२८१२४४ या क्रमांकावरून संपर्क साधणा-या मनिश शर्मा नामक इसमाने त्यांना ब्ल्यू डार्ट या कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून हा गंडा घातला. डॉ. पवार यांनी मागविलेल्या पार्सलचे प्रोसेसिंग फी भरण्याच्या नावाखाली संशयितांने त्यांना एक लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. ऑनलाईन प्राप्त पेजवर युपीआय पीन टाकण्यास सांगून भामट्यांनी त्यांच्या फोन पे ला लिंक असलेल्या एसबीआय,कोटक महिंद्रा आणि पंजाब नॅशनल या तीन बँक खात्यातील सुमारे २ लाख ७६ हजार १०० रूपयांच्या रक्कमवर डल्ला मारला. याप्रकरणी संपर्क साधणा-या मोबाईलधारकासह पैसे वर्ग झालेला बँक खातेधारक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.