नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गुरुवारी वेगवेगळय़ा भागात चक्कर येऊन पडल्याच्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली आणि सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना सातपूर येथे घडली. अजय मनोहर खोचे (४९ रा.बालाजी हाईटस,गणेश नगर) हे गुरूवारी आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत ते बेशुध्द झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. दुसरी घटना जीपीओ रोडवर झाली. म्हसरूळरोड भागातील अशोककुमार मोतीलाल महाजन (६९ रा.साईबाबा मंदिरासमोर,श्रीरामचंद्रनगर) हे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जीपीओ रोडवरील बिर्ला आय हॉस्पिटल समोरून पायी जात असतांना अचानक चक्कर येवून पडले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ.कुणाल पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत.