नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगीक वसाहतीतील आशाकीन मल्टीलेव्हल कार पार्किग सिस्टीम प्रा.लि. या कारखान्याच्या वर्कशॉपमधून किमती वस्तू चोरणा-या चोरट्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरट्यांचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहे. साकेत रीव निंबोळे (२२ रा.सप्तशृंगी मंदिराजवळ वरचे चुंचाळे,अंबड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी केशव सुभाष चौधरी (रा.दुर्गानगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड औद्योगीक वसाहतीतील या कारखान्याच्या भिंतवरून उडी घेत चोरट्यांनी वर्कशॉप मधील केबल ग्लॅड,कॉपर पट्या व कोर केबल वायर असा सुमारे १ लाख ५२ हजार ८२० रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना शुक्रवारी घडली होती. कारखान्याच्या सीसीटिव्ही यंत्रणेत ही चोरी तीन चोरट्यांनी केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अबड पोलिस ठाण्यात अज्ञात त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिल संशयित पोलिसांच्या हाती लागला आहे. अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.